लातूर : ओबीसी आरक्षण संपले या भावनेतून लातूर जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड (३५) असे या तरुणाचे नाव आहे. तो लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात राहत होता. या घटनेनंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर आता मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एकत्र कराड कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कराड कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. आत्महत्या करु नका, असे आवाहन सर्वांना केले.
धनंजय मुंडे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आत्महत्या केलेल्या भरत कराड यांच्याबद्दल भाष्य केले. माझी हात जोडून विनंती आहे की ज्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे, तेच जर अशाप्रकारे आत्महत्या करु लागले, मग हे आरक्षण द्यायचं कोणाला. त्यामुळे कोणीही अतातायीपणा करु नका. सरकार अतिशय सजग आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.
कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही
आरक्षण वाचावं म्हणून एकाने आपल्या जीवनाची अहुती दिली आहे. ती अहुती देताना त्याला तीन मुली, एक मुलगा, बायको घरदार काहीही दिसले नाही. ही तीव्रता महाराष्ट्रात आपण पाहतोय. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की ज्यांना आरक्षणाचा फायदा होणार आहे, तेच जर अशाप्रकारे आत्महत्या करु लागले, मग हे आरक्षण द्यायचं कोणाला. त्यामुळे कोणीही अतातायीपणा करु नका. सरकार अतिशय सजग आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची खात्री घेतलेली आहे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
आत्महत्या करु नका
त्यामध्ये या सर्व गोष्टी पाहत असताना आता दोन जातीचे मित्र एकमेकांच्या जीवावर उठत आहेत. काही जिल्ह्यात तर पोलिसांना ड्रेसकोडवर आडनाव लावायची बंदी आहे. हे छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. त्यामुळे आता आपल्याला सर्वांना प्रयत्न करुन ती समता आपल्याला प्रस्थापित करावी लागेल. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाला धोका लागणार नाही याची काळजी घेतली आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही. आत्महत्या करु नका, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.